नशिराबाद प्रकरणी विद्यार्थ्यांना दिलासा; सीईओ मिलन करणवाल यांचा तत्पर निर्णय – एकता संघटनेचं आभार प्रदर्शन
महाराष्ट्र वाणी न्युज
जळगाव, दि. २ जुलै :- नशिराबाद येथील एका अल्पसंख्याक खाजगी शाळेतील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला मिळत नव्हता. दीड महिना उलटूनही या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र रखडल्यामुळे त्यांच्या पुढील प्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ही गंभीर बाब एकता संघटनेचे फारुक शेख यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिलन करणवाल यांच्या निदर्शनास आणून दिली.
या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करताना सीईओ करणवाल यांनी अवघ्या तीन दिवसांत ८० विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले मिळवून दिले. त्यांच्या या तत्परतेमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, याबद्दल एकता संघटना आणि संबंधित विद्यार्थी यांच्या वतीने बुधवारी सीईओ कार्यालयात त्यांची भेट घेऊन त्यांचे १०१ वह्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार प्रदर्शन करण्यात आले.
"शिका आणि माझ्यासारखे अधिकारी व्हा" – सीईओ करणवाल यांचा विद्यार्थ्यांना संदेश
विद्यार्थ्यांनी आभार मानण्यासाठी जेव्हा सीईओ करणवाल यांची भेट घेतली, तेव्हा त्या केवळ एक अधिकारी नसून मातेसमान माया असलेल्या व्यक्तिमत्त्वाची झलक दिसली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एका विद्यार्थ्याच्या प्रकृतीकडे लक्ष देत त्याला चांगल्या आहाराचे महत्व पटवून दिले आणि सर्व विद्यार्थ्यांना – विशेषतः मुलींना – “चांगलं शिका, आणि माझ्यासारखे अधिकारी बना,” असा प्रेरणादायी संदेश दिला.
शासनाच्या निर्णयाचेही स्वागत
यापूर्वी २८ मे २०२५ रोजी एकता संघटनेने राज्यातील शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व अल्पसंख्यांक आयोगाला निवेदन दिले होते. फक्त जळगाव जिल्ह्यातच ४४९ अयोग्य भरती (शिक्षक, शिपाई, लिपिक) झाल्याचा आरोप करत या संदर्भात एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर, १ जुलै रोजी विधानसभेत शिक्षण मंत्र्यांनी राज्यात शिक्षण विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी एसआयटी नेमण्याची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे एकता संघटनेने महाराष्ट्र शासनाचेही आभार मानले आहेत.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
या आभार प्रदर्शन कार्यक्रमास एकता संघटनेचे पदाधिकारी फारुक शेख, नदीम मलिक, अन्वर सिकलगर, अनिस शाह, मतीन पटेल, तसेच नशिराबाद येथून वासिफ सर, शरीफ शेख, मोहम्मद अयाज शेख, इरफान मन्यार, मोहम्मद जाहिद सय्यद, सलीम मन्यार, फैसल खालिद मन्यार, हयात शेख फिरोज, शिफा शेख शरीफ, आसेफा शकील मोमीन, शरीफ हनिफ शेख, शकील मोमीन, मुज्जमील हारुण शेख आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल यांना १०१ नोटबुक भेट देताना एकता संघटनेचे फारुक शेख, पदाधिकारी व विद्यार्थी
शेवटी एकच... जनहितासाठी लढा दिला तर यश नक्कीच मिळतं – आणि हेच एकता संघटनेनं दाखवून दिलं!