“नगरसेवक म्हणजे परिसराचा पालक; दर्जेदार शिक्षण, आरोग्य व रोजगारावर भर द्यायलाच हवा” – अॅड. अझर पठाण
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ६ —
महानगरपालिकेत निवडून येणारा प्रत्येक नगरसेवक हा केवळ लोकप्रतिनिधी नसून तो त्या परिसराचा पालक असतो. शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी त्याच्यावर असते, असे प्रतिपादन समाजसेवक तथा मार्टि कृती समितीचे अध्यक्ष अॅड. अझर पठाण यांनी केले.
शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता पायाभूत सुविधांवर अधिक प्रभावी व दूरदृष्टीपूर्ण काम होणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांना आपले शहर आपलेसे वाटावे, यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि सार्वजनिक सुविधा यामध्ये दर्जा व पारदर्शकता गरजेची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेने सुरू केलेल्या सीबीएसई शाळा हा स्वागतार्ह निर्णय असला तरी, पुढील टप्प्यात आयबी (IB) आणि आयसीएसई (ICSE) दर्जाच्या शाळा सुरू करण्यासाठी ठोस प्रयत्न होणे गरजेचे आहे. गोरगरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना परवडणारे आणि दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
तसेच, शहरातील १०० हून अधिक ओपन स्पेसचा योग्य वापर करून तेथे स्वच्छता, सीसीटीव्ही, ओपन जिम, चालण्याचे ट्रॅक अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांसाठी सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल. महिला सक्षमीकरणाच्या योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिक्षण व आरोग्याबरोबरच रोजगारनिर्मिती हेही शहर विकासाचे महत्त्वाचे सूत्र असून, नव्या धोरणांच्या माध्यमातून युवकांना संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे अॅड. पठाण यांनी यावेळी अधोरेखित केले.
शहराचा विकास म्हणजे केवळ इमारती नव्हे, तर सुजाण नेतृत्वातून घडणारे सक्षम भविष्य होय!