दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! १ लाख ६६ हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; भरलेली रक्कमही मिळणार परत
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २४ :- दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिलासा दिला आहे. विद्यापीठाकडून हिवाळी सत्राच्या परीक्षांसाठी तब्बल १ लाख ६६ हजार ८५५ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी परीक्षा शुल्क भरलेल्या आणि शुल्कमाफीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही भरलेली रक्कम परत मिळणार आहे.
विद्यापीठाने २१ ऑक्टोबरपर्यंत पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज कोणतेही शुल्क न आकारता स्वीकारले. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे परीक्षा शुल्क भरण्याची चिंता असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला आहे.
पुनर्परीक्षार्थींनाही लाभ
या शुल्कमाफी योजनेचा लाभ केवळ नियमित विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसून, पुनर्परीक्षार्थींनाही मिळणार आहे. यापूर्वी शुल्क भरले असले, तरी योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित रक्कम परत केली जाणार आहे.
दरम्यान, विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्रातील परीक्षांना २७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असल्याची माहिती परीक्षा विभागाने दिली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित