काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इब्राहिम पठाण यांचा सत्कार; उत्तर महाराष्ट्र अल्पसंख्याक प्रभारीपदी नियुक्ती
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि २१ :- काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते इब्राहिम पठाण यांची उत्तर महाराष्ट्र अल्पसंख्याक काँग्रेसचे प्रभारी म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्वपूर्ण नियुक्तीनंतर जळगाव येथे अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस कमिटी आणि अल्पसंख्याक शहर काँग्रेस कमिटीतर्फे त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात काँग्रेस विचारधारेप्रती निष्ठा ठेवून अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांवर संघर्ष करणाऱ्या इब्राहिम पठाण यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. उत्तर महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाचे संघटन बळकट करण्यासाठी आणि पक्षविस्तारासाठी ते योगदान देतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव इंजिनीअर शेख इफ्तेखार, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव आमेर अब्दुल सलीम, अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, अल्पसंख्याक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, साजिद कुरेशी, मोइन कुरेशी, नदीम सौदागर, शोएब अब्दुल्ला, इरफान इब्राहिम पठाण, सय्यद फराज आणि आबिदी आदी मान्यवर उपस्थित होते.
इब्राहिम पठाण यांनी या सत्काराबद्दल उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. ते म्हणाले की, “काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक विचारांचा पक्ष आहे. अल्पसंख्याक समाजाच्या न्याय व अधिकारांसाठी संघर्ष करण्याची संधी मला मिळाली आहे. उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसची विचारधारा घराघरात पोहोचवण्याचे काम मी जबाबदारी म्हणून पार पाडणार आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्पसंख्यांक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली.