ऑनलाइन खत विक्रीच्या सक्तीमुळे शेतकरी त्रस्त; आजाद समाज पार्टीचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि. ११खरीप हंगामाच्या तोंडावर ऑनलाइन खत विक्री (Framework for Fertilizer Sale) प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करत आजाद समाज पार्टी (काशीराम) यांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी विधाते यांना निवेदन देण्यात आले.
प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी अरविंद कांबळे आणि जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे यांनी ऑनलाइन खत विक्री प्रणालीतील वारंवार बंद पडणारा सर्व्हर, ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव आणि तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळण्यात येणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती दिली. यामुळे खरीप पेरणी आणि पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
निवेदनात ऑनलाइन खत विक्रीची सक्ती तात्पुरती शिथिल करून ऑफलाइन पद्धतीने खत विक्रीला परवानगी द्यावी, सर्व्हर सुरळीत चालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, ग्रामीण भागातील इंटरनेट समस्येसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी आणि शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळेल याची खात्री करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
निवासी जिल्हाधिकारी विधाते यांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्या शासनाकडे तातडीने पाठवून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
यावेळी अरविंद कांबळे (प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी), शिवाजी वीर (मराठवाडा अध्यक्ष), विजय शिनगारे (जिल्हाध्यक्ष), तातेराव ससाने (मराठवाडा कार्याध्यक्ष), काशिनाथ भाडेगावकर (मराठवाडा महासचिव), राहुल साबळे (जिल्हा प्रभारी), जावेद शेख (शहराध्यक्ष), अनामी मोरे (युवा जिल्हाध्यक्ष), साहेबराव दाभाडे (जिल्हा उपाध्यक्ष), नवाब पटेल (अल्पसंख्यांक शहराध्यक्ष पश्चिम), अमोल सोनवणे (शहर उपाध्यक्ष), अल्ताफ शेख (शहर उपाध्यक्ष) आणि भगवान ठोकळ (तालुका उपाध्यक्ष) उपस्थित होते.
👉 "खतासाठी ऑनलाइन अडथळे नकोत; शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळणे हीच खरी गरज," अशी भूमिका आजाद समाज पार्टीने मांडली.