एसटीच्या १३,९८० पदांच्या कंत्राटी भरतीत फसवणूक केल्यास खैर नाही! खासगी संस्थांची चौकशी करण्याचे प्रताप सरनाईक यांचे आदेश
नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश; भरती प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यावर भर
मुंबई, दि. १४ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आगामी कंत्राटी भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. महामंडळात सुमारे १३ हजार ९८० चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती प्रस्तावित असून, ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि निर्धारित नियमांनुसार पार पाडण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
बाह्य संस्थेमार्फत होणाऱ्या उमेदवारांच्या निवडीसाठी एसटी महामंडळाने निश्चित केलेल्या पात्रता आणि निकषांचे काटेकोर पालन झाले पाहिजे. भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही उमेदवाराची आर्थिक किंवा अन्य प्रकारे फसवणूक होणार नाही, याची जबाबदारी एसटी प्रशासनाने घ्यावी, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांची आर्थिक लूट
एसटी महामंडळाच्या नावाचा गैरवापर करून काही खासगी संस्था बेरोजगार तरुणांना नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. या माध्यमातून उमेदवारांकडून बेकायदेशीरपणे पैसे वसूल केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नोकरीच्या अपेक्षेने अशा संस्थांवर विश्वास ठेवणाऱ्या तरुणांची आर्थिक फसवणूक होत असून, यामुळे महामंडळाच्या विश्वासार्हतेलाही धक्का बसत असल्याचे मंत्री सरनाईक यांनी म्हटले.
दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
या प्रकरणाची गंभीर दखल घेत एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाला अशा गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भरतीच्या नावाखाली उमेदवारांकडून पैसे उकळणाऱ्या संस्था आणि त्यामागील संबंधित व्यक्तींची ओळख पटवून दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
भरती प्रक्रियेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य
बेरोजगार तरुणांच्या नोकरीच्या आशेचा गैरफायदा घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, विश्वासार्हता आणि उमेदवारांचे हित जपणे हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे, असे प्रताप सरनाईक यांनी बजावले आहे.
त्यामुळे एसटीच्या आगामी भरतीकडे लक्ष लागले असून, गैरप्रकार करणाऱ्या खासगी संस्थांवर प्रशासनाकडून कोणती कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र वाणी |
सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित