‘उडान २०२६’चा दिमाखदार सोहळा! कागजीपुरा वेल्फेअर सोसायटीतर्फे १५०० हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

‘उडान २०२६’चा दिमाखदार सोहळा! कागजीपुरा वेल्फेअर सोसायटीतर्फे १५०० हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
‘उडान २०२६’चा दिमाखदार सोहळा! कागजीपुरा वेल्फेअर सोसायटीतर्फे १५०० हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

एरंडोल दि १४ :- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाला प्रोत्साहन देण्यासोबतच समाजात शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कागजीपुरा वेल्फेअर सोसायटी आणि कागजीपुरा पंच कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला बारावा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा ‘उडान २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याला १५०० हून अधिक नागरिकांनी उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात शैक्षणिक वर्षात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, उच्च शिक्षणाच्या संधी, विविध करिअर पर्याय आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सर्व समाजांच्या विकासातूनच विकसित भारत घडेल : आमदार अमोल पाटील

कार्यक्रमात आमदार अमोल चिमणराव पाटील यांनी मार्गदर्शन करताना शिक्षणासोबत सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशक विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. भारताला महासत्ता बनवायचे असेल, तर केवळ एका समाजाची प्रगती पुरेशी ठरणार नाही. हिंदू, मुस्लिम यांच्यासह सर्व समाजघटकांना शिक्षण, रोजगार आणि सामाजिक क्षेत्रात समान संधी मिळणे गरजेचे आहे. सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करणे, हाच विकसित भारताचा खरा मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले.

समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने सकारात्मक विचार ठेवून सामाजिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. काळानुसार बदल स्वीकारत समाजहितासाठी एकत्रितपणे काम केल्यासच खऱ्या अर्थाने विकास साधता येईल, असेही त्यांनी सांगितले.

कागजीपुरा परिसराच्या विकासाचे मुद्दे उपस्थित

एरंडोल शहरासह कागजीपुरा परिसरातील नागरी सुविधांचे प्रश्न आणि सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने यावेळी चर्चा करण्यात आली. परिसरातील विविध विकासकामांसंदर्भात आमदार अमोल पाटील आणि नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदन देण्याचा विषय सोसायटीच्या वतीने उपस्थित करण्यात आला. नगरसेविका नजमा सईद कागदी यांच्या वतीने मुदब्बीर कागदी यांनी या संदर्भातील भूमिका मांडली.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला आमदार अमोल चिमणराव पाटील, नगराध्यक्ष नरेंद्र ठाकूर, शिवसेनेचे गटनेते मनोज पाटील, कागजीपुरा वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आकील कागदी, सचिव इरफान हसन, खजिनदार सिराज कबीरुद्दीन, सूरत येथील काँग्रेस नेते असलम सायकलवाला, नगरसेविका नजमा सईद कागदी, सय्यद शबाना नूरुद्दीन, नगरसेवक इम्रान अली, नितेश चौधरी, रवींद्र महाजन आदी उपस्थित होते.

तसेच माजी नगरसेवक शहबुद्दीन कागदी, माजी नगरसेविका आबेदा आपा, अस्लम पिंजारी, आफाक सर, नदीम सर, जावेद सर, सागिर सर, फारूक सर, एजाज सर, अब्दुल सत्तार गनी, आसिफ अब्दुल करीम, सिराज अब्दुल जब्बार, शरीफ करीमुद्दीन, अस्लम शहबुद्दीन, नासिर रुस्तम, इक्बाल जहूर, सद्दाम कागदी, डॉ. जुनेद अन्वर, शहबुद्दीन अब्दुल रहीम, सय्यद नूरुद्दीन (बाबू सेठ), शेख साजिद, इलियास अब्दुल रशीद यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवर, पालक, विद्यार्थी, नागरिक तसेच आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या युवकांचे आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारे आणि समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणारे असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धारही आयोजकांनी व्यक्त केला.

कागजीपुरा वेल्फेअर सोसायटी आणि कागजीपुरा पंच कमिटीच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडलेल्या ‘उडान २०२६’ या उपक्रमाने शिक्षण, सामाजिक एकता आणि गुणवंतांचा सन्मान हा सकारात्मक संदेश दिला.

महाराष्ट्र वाणी | 

सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित