इकरा युनानी मेडिकल कॉलेजची सुवर्ण कामगिरी; दोन विद्यार्थिनींनी पटकावले गोल्ड मेडल
महाराष्ट्र वाणी
जळगाव (प्रतिनिधी) दि ३१ :- इकरा युनानी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) बी.यू.एम.एस. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी विद्यापीठाच्या गुणवंत यादीत स्थान मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील बी.यू.एम.एस. प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या निकालात काझी नूर फातेमा अजिमुद्दीन यांनी विद्यापीठात सर्वाधिक गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून त्यांना प्रतिष्ठेचे "व्हाइस चान्सलर गोल्ड मेडल" प्रदान करण्यात आले.
तसेच, शैक्षणिक वर्ष २०२४ च्या हिवाळी सत्रातील प्रथम वर्ष बी.यू.एम.एस. परीक्षेत बुशरा अजिम खान यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील युनानी महाविद्यालयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत आणखी एक सुवर्णपदक आपल्या नावे केले.
या दोन्ही गुणवंत विद्यार्थिनींचा संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार, सचिव एजाज मलिक आणि तारिक अन्वर शेख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल कद्दूस आणि उपप्राचार्य डॉ. शोएब शेख यांनीही विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी डॉ. इक्बाल शेख, डॉ. नसीम अन्सारी, डॉ. अजीम काझी, डॉ. एजाज शाह, डॉ. समीना खान, डॉ. सुमय्या शेख यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
इकरा युनानी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या या दुहेरी सुवर्ण यशामुळे महाविद्यालयासह जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.