आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा भव्य सत्कार; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत बुलंद आवाज उठवण्याचा विश्वास!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांचा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथील रोजेबाग परिसरात सत्कार करण्यात आला. यावेळी सत्तार यांनी डॉ. पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील संसदीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सत्कार सोहळ्यावेळी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी पदवीधर मतदारसंघातील सुशिक्षित तरुण, बेरोजगार पदवीधर, शिक्षक तसेच इतर घटकांच्या विविध प्रश्नांचा उल्लेख केला. या सर्व प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे वाचा फोडून संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील निश्चितच प्रयत्नशील राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पदवीधरांच्या अपेक्षा आणि समस्यांना विधान परिषदेत योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांसाठी ठोस भूमिका मांडली जावी आणि त्यांच्या प्रश्नांची प्रभावी सोडवणूक व्हावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना सिल्लोड तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, कृष्णा पा. डोणगावकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश ताठे, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र उर्फ बापू पाटील, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, पंचायत समिती सदस्य शेख सलीम, निजाम पठाण, सोमनाथ हराळ, नगरसेवक रऊफ बागवान, अकील वसईकर, शेख इमरान उर्फ गुड्डू, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सयाजीराव वाघ, प्रशांत क्षीरसागर, सिल्लोड तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रमेश पाटील, पालोद गावचे सरपंच नासेर पठाण यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ पदवीधर, बेरोजगार तरुण आणि शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देणारा ठरेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित