अल्पसंख्याक विद्यार्थी व शिक्षकांवरील अन्याय थांबवा; १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

अल्पसंख्याक विद्यार्थी व शिक्षकांवरील अन्याय थांबवा; १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा
अल्पसंख्याक विद्यार्थी व शिक्षकांवरील अन्याय थांबवा; १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

महाराष्ट्र वाणी

जळगाव दि २९ :- महानगरपालिकेच्या उर्दू प्राथमिक शाळांमधील रिक्त मुख्याध्यापक व शिक्षक पदे तातडीने भरावीत, अन्यथा १५ ऑगस्ट २०२६ पासून आमरण उपोषण व जनआंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा जळगाव जिल्हा एकता संघटनेने महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे.

संघटनेचे अध्यक्ष मुफ्ती खालिद यांच्या नेतृत्वाखाली तसेच समन्वयक फारुक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने मनपा आयुक्त आदित्य जीवने यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी अल्पसंख्याक विद्यार्थी कृती समितीचे सय्यद शाहिद, सय्यद चांद यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिकेच्या १० उर्दू प्राथमिक शाळांपैकी ७ शाळा गेल्या चार वर्षांपासून मुख्याध्यापकांविना सुरू आहेत. त्यामुळे हजारो अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे.

तसेच प्रत्यक्षात शिक्षकांची अनेक पदे रिक्त असतानाही 'पवित्र पोर्टल'वर कमी रिक्त जागा दाखवून भरती प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

प्रमुख मागण्या

पात्र सात शिक्षकांना तात्काळ मुख्याध्यापकपदावर पदोन्नती द्यावी.

रिक्त शिक्षक पदांवर त्वरित भरती करावी.

सर्व वास्तविक रिक्त पदे 'पवित्र पोर्टल'वर दर्शवून पारदर्शक भरती प्रक्रिया राबवावी.

गेल्या चार वर्षांतील कथित दुर्लक्षाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.

संघटनेने प्रशासनाला १० ऑगस्ट २०२६ पर्यंत लेखी आदेशासह ठोस निर्णय घेण्याची मुदत दिली आहे. मुदतीत न्याय न मिळाल्यास १५ ऑगस्टपासून संविधान व कायद्याच्या चौकटीत राहून आमरण उपोषण, धरणे आंदोलन आणि व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, अशी भूमिका संघटनेने स्पष्ट केली.

दरम्यान, मनपा आयुक्त आदित्य जीवने यांनी निवेदन स्वीकारून प्रकरणाची गंभीर दखल घेत आवश्यक ती तातडीची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे संघटनेने सांगितले.

फोटो कॅप्शन :

जळगाव मनपा आयुक्त आदित्य जीवने यांना निवेदन सादर करताना फारुक शेख व सय्यद चांद.

मनपा कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फारुक शेख, सय्यद शाहिद तसेच एकता संघटना व अल्पसंख्याक विद्यार्थी कृती समितीचे पदाधिकारी.