परळीत सत्तेसाठी वैचारिक भिंती कोसळल्या! शिंदेसेना–राष्ट्रवादीने थेट एमआयएमला सोबत घेतलं, राजकारणात खळबळ
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ९ :- अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली असतानाच, आता बीड जिल्ह्यातील परळी नगरपरिषदेतून आणखी एक धक्कादायक सत्तासमीकरण समोर आले आहे. परळी नगरपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट एमआयएमला सोबत घेत स्वतंत्र गट स्थापन केला आहे.
या अनपेक्षित युतीमुळे राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, विरोधकांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका सुरू केली आहे. परळी नगरपरिषदेत एकूण ३५ नगरसेवक असून, नगराध्यक्षपदावर आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे.
गटनेतेपदाच्या निवडीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपली राजकीय ताकद एकत्र करत एमआयएमच्या एका नगरसेवकासह चार अपक्ष नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवले. या नव्या सत्तागटात राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, शिवसेनेचे २, एमआयएमचा १ आणि ४ अपक्ष असे एकूण २४ नगरसेवक सहभागी झाले आहेत.
या सत्तागटाचे नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली आहे. अकोट आणि अंबरनाथमधील राजकीय वाद अजूनही शांत होत नसतानाच, परळीत शिंदेसेना–राष्ट्रवादी–एमआयएम युतीमुळे हिंदुत्व आणि सत्ताकारणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.
👉 सत्तेसाठी कोण कुणासोबत? परळीतील हे समीकरण आगामी राजकारणाची दिशा बदलणार का?