“नाल्यांवरील अतिक्रमणांवर बुलडोझर चालणार!” — सभापती अनिल मकरीये यांचा जय भवानी नगरात धडक दौरा

“नाल्यांवरील अतिक्रमणांवर बुलडोझर चालणार!” — सभापती अनिल मकरीये यांचा जय भवानी नगरात धडक दौरा
“नाल्यांवरील अतिक्रमणांवर बुलडोझर चालणार!” — सभापती अनिल मकरीये यांचा जय भवानी नगरात धडक दौरा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ११ :- शहरातील नाल्यांवरील अतिक्रमण आणि अस्वच्छतेविरोधात महानगरपालिका प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली असून, स्थायी समिती सभापती अनिल मकरीये यांनी जय भवानी नगर परिसरात धडक पाहणी करत अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश दिले. “नाल्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवा आणि संपूर्ण साफसफाई त्वरित पूर्ण करा,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

सोमवारी सकाळी ८ वाजता जय भवानी नगर ते झेंडा चौक या भागातील नाल्यांची पाहणी करण्यात आली. यावेळी नाल्यामध्येच करण्यात आलेली एक बोरवेल त्यांच्या निदर्शनास आली. ही बोरवेल नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असे सांगत त्यांनी ती तात्काळ हटविण्याचे आदेश दिले.

दरम्यान, झेंडा चौक परिसरात नाल्यावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेली भिंतही आढळून आली. या भिंतीमुळे पाण्याचा प्रवाह अडत असल्याचे लक्षात आल्यानंतर ती त्वरित पाडण्याचे निर्देश मकरीये यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच उघड्या नाल्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने जाळ्या बसविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

या पाहणीदरम्यान नगरसेवक बालाजी मुंडे, नगरसेविका सुरेखा गायकवाड तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यापूर्वीही सभापती मकरीये यांनी मोती कारंजा ते संभाजी पेठ परिसरातील नाल्यांची पाहणी करून साफसफाईचे आदेश दिले होते. सोमवारी त्यांनी त्या कामांचाही आढावा घेतला. मोती कारंजा येथे सुरू असलेल्या नाला सफाई कामात गती आणण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच नाल्यांची अचूक हद्द निश्चित करण्यासाठी मोजणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

औषधी भवन परिसरातील नाला सफाई कामाचीही त्यांनी पाहणी केली असून, दोन्ही ठिकाणांवरीील कामे पुढील चार दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

“अतिक्रमण हटवा, नाले मोकळे करा… अन्यथा कारवाई अटळ!” असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.

वाचत रहा — महाराष्ट्र वाणी