NEET घोटाळ्याविरोधात छत्रपती संभाजीनगरात NSUI आक्रमक!“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही”; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १४ :- देशभरात गाजत असलेल्या नीट (NEET) परीक्षेतील गैरव्यवहार आणि एनटीए (NTA) संस्थेच्या कथित ढिसाळ कारभाराविरोधात आज क्रांती चौक येथे एनएसयूआय (NSUI) तर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेल्या गंभीर अन्यायाचा निषेध करत आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
या आंदोलनाचे नेतृत्व एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष अभिषेक शिंदे पाटील आणि राज्य उपाध्यक्ष शादाब शेख यांनी केले. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी विशेष उपस्थिती लावली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष किरण डोणगावकर, भाऊसाहेब जगताप, डॉ. जितेंद्र देहाडे, डॉ. निलेश अंबेवाडीकर, बाबासाहेब पवार, अशोक डोळस, अतिश पितळे आणि प्रकाश सानप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान एनटीए संस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “विद्यार्थ्यांच्या मेहनतीची थट्टा करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा आणि एनटीए संस्था बरखास्त करावी, अशी ठाम भूमिका एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी मांडली.
यावेळी आकाश रगडे, मध्य विधानसभा अध्यक्ष एजाज शेख, झईद शेख, सुमेध गायकवाड, उमर पटेल, निखिल गायकवाड, सृजन गावडे, ऋषी डुकळे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
“विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड सहन केली जाणार नाही,” असा इशारा देत NSUI ने केंद्र सरकारविरोधात संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला