समाजभिमुख पत्रकारितेसाठी आरेफ देशमुख यांचा 'समाजरत्न' पुरस्काराने गौरव

समाजभिमुख पत्रकारितेसाठी आरेफ देशमुख यांचा 'समाजरत्न' पुरस्काराने गौरव
समाजभिमुख पत्रकारितेसाठी आरेफ देशमुख यांचा 'समाजरत्न' पुरस्काराने गौरव

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १७ :- पत्रकारितेच्या माध्यमातून गेल्या 23 वर्षांपासून सातत्याने समाजहिताचे प्रश्न मांडत निर्भीड आणि वस्तुनिष्ठ वृत्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार आरेफ देशमुख यांना राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीतर्फे 'समाजरत्न' पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. समितीच्या वर्धापन दिनानिमित्त भारतरत्न मौलाना आझाद रिसर्च सेंटरच्या सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीकडून दरवर्षी पुरस्कारांचे वितरण केले जाते. यावर्षी पत्रकारिता, शिक्षण, आरोग्य, प्रशासन, समाजसेवा आणि जनहिताच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये पत्रकारितेद्वारे लोकहिताचे प्रश्न सातत्याने मांडणाऱ्या आरेफ देशमुख यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली.

पुरस्कार वितरणावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.

आरेफ देशमुख यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेला सामाजिक जबाबदारी मानून काम केले आहे. जनतेच्या समस्या, विकासकामे, प्रशासकीय विषय तसेच अन्यायाविरोधातील प्रश्न प्रभावीपणे मांडत त्यांनी विश्वासार्ह आणि निर्भीड पत्रकार म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीने त्यांना 'समाजरत्न' पुरस्काराने सन्मानित केले.

या कार्यक्रमाला आरटीओ विजय काठोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख, पोलिस उपनिरीक्षक लता जाधव, संपादक शारेक नक्शबंदी, खुलताबादचे नगराध्यक्ष आमेर पटेल, समितीचे राष्ट्रीय प्रमुख सय्यद साबेर, संस्थापक सचिव मोहम्मद अखिल अहमद रामपुरे, माजी नगरसेवक शेख शफीक, महाराष्ट्र उपाध्यक्ष अब्दुल कय्यूम, मराठवाडा अध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष अलीम बेग, हाफीज अली, समाजसेवक साजिद मौलाना यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात समितीचे राष्ट्रीय प्रमुख सय्यद साबेर यांनी संस्थेच्या भ्रष्टाचारविरोधी उपक्रमांचा आढावा घेत समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एम. शेख यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजकुमार सूर्यवंशी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.