‘शेतकऱ्यांना ५ हजारांचे चॉकलेट देऊन सरकार अन्नदात्याची थट्टा करतंय’; रोहित पवारांचा संताप, हेक्टरी १ लाखांच्या मदतीची मागणी

‘शेतकऱ्यांना ५ हजारांचे चॉकलेट देऊन सरकार अन्नदात्याची थट्टा करतंय’; रोहित पवारांचा संताप, हेक्टरी १ लाखांच्या मदतीची मागणी

पुणे, दि. १५ : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना सरकारकडून दिली जाणारी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत अपुरी असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी किमान एक लाख रुपये, तर शेतमजुरांना प्रतिकुटुंब २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असताना सरकारने अग्रीम मदत म्हणून केवळ पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची बोळवण केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. आज शेतीच्या मशागतीसाठीच हेक्टरी ३० ते ५० हजार रुपये खर्च येत असताना पाच हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले.

सरकारकडून जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एवढी तुटपुंजी रक्कम का दिली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अन्नदाता आर्थिक अडचणीत असताना त्याला पुरेशी मदत देण्याऐवजी केवळ पाच हजार रुपये देणे म्हणजे बळीराजाच्या परिस्थितीची थट्टा असल्याची टीका त्यांनी केली.

शेतकऱ्यांना ३० ते ३५ हजारांची अग्रीम मदत देण्याची मागणी

सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याच्या मागणीपैकी किमान ३० ते ३५ हजार रुपये अग्रीम स्वरूपात तातडीने द्यावेत. तसेच शेतमजुरांना प्रतिकुटुंब २५ हजार रुपये मदत देण्याच्या मागणीपैकी किमान १० हजार रुपये अग्रीम रक्कम म्हणून द्यावेत, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

सरकारने शेतकरी आणि शेतमजुरांच्या आर्थिक संकटाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. अन्यथा, शेतकऱ्यांमधील रोष वाढेल आणि नेत्यांना व मंत्र्यांना दिवाळी साजरी करणे तसेच गावागावांत फिरणेही कठीण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि शेतमजुरांना पुरेशी आर्थिक मदत मिळावी, यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित