रविराज साबळे पाटील यांची पदवीधर मतदारसंघातून अपक्ष लढण्याची घोषणा; म्हणाले, “पैसा-यंत्रणा नाही, पण जिगर आहे!”

रविराज साबळे पाटील यांची पदवीधर मतदारसंघातून अपक्ष लढण्याची घोषणा; म्हणाले, “पैसा-यंत्रणा नाही, पण जिगर आहे!”

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३० :- आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविराज साबळे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. समर्थक आणि पदवीधरांच्या मागणीमुळे आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

राजकारणात का यायचे, आपल्याला त्याच्याशी काय देणेघेणे, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, अशाच भूमिकेमुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत साबळे पाटील यांनी व्यक्त केले. विद्यार्थी आणि पदवीधरांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

“निवडणूक आली की पदवीधरांच्या संपर्कात येण्यापेक्षा त्यांच्या प्रश्नांसाठी नियमितपणे मैदानात राहणे आवश्यक आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. आपण राजकारणात रस नाही असे म्हणत बाजूला राहिलो, तर परिस्थितीत बदल होणार नाही. त्यामुळे स्वतः पुढे येऊन ही लढाई लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ही निवडणूक मोठी असून आव्हानही निश्चितच आहे, याची जाणीव असल्याचे सांगत साबळे पाटील यांनी आपल्या प्रचारासाठी पदवीधर आणि नागरिकांनी स्वतः पुढाकार घेण्याचे आवाहन केले. आपल्याकडे मोठी आर्थिक ताकद, निवडणूक यंत्रणा किंवा मोठा कार्यकर्ता वर्ग नसला तरी लढण्याची इच्छाशक्ती आणि जिद्द असल्याचे त्यांनी नमूद केले.

पदवीधरांच्या हक्कांसाठी आपण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरत असून, या लढाईत जनतेच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे रविराज साबळे पाटील यांनी सांगितले.

“पैसा आणि यंत्रणा नसली तरी जिगर आहे. तुमच्या साथीने ही लढाई लढायची आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेवटी त्यांनी समर्थकांना आणि पदवीधरांना निवडणुकीत साथ देण्याचे आवाहन करत “जय भीम, जय शिवराय, जय मल्हार, जय लहुजी, जय भगवान, जय जोहार!” अशा घोषणांनी आपले निवेदन पूर्ण केले

महाराष्ट्र वाणी 

सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित