भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीविरोधात SDPI ची मानव साखळी; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीविरोधात SDPI ची मानव साखळी; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीविरोधात SDPI ची मानव साखळी; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३० :- भीमाशंकर (कर्जत) परिसरात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI), औरंगाबादच्या वतीने शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) मानव साखळी आंदोलन करण्यात आले. गंजेशहीदा मशीद ते नदवी चौक, जिन्सी रोडदरम्यान दुपारी २:१५ ते ३:१५ या वेळेत झालेल्या या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत वृक्षतोडीविरोधात आवाज उठवला.

भीमाशंकर परिसरातील जंगलतोडीमुळे पर्यावरणीय संतुलन, जैवविविधता, वन्यजीवांचे अधिवास आणि जलस्रोत धोक्यात येण्याची शक्यता असल्याची चिंता आंदोलकांनी व्यक्त केली. जंगलतोडीचा परिणाम तापमानवाढ, मातीची धूप, पाणीटंचाई आणि पावसाच्या नैसर्गिक चक्रावर होऊ शकतो. त्यामुळे विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश होता कामा नये, अशी भूमिका SDPI च्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

या वेळी प्रशासन आणि शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या. भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड तातडीने थांबवावी, वृक्षतोडीसंदर्भातील परवानग्या आणि पर्यावरणीय मंजुरीचे अहवाल सार्वजनिक करावेत, तसेच स्वतंत्र व निष्पक्ष पर्यावरणीय अभ्यास पूर्ण होईपर्यंत संबंधित कामांना स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय नियमबाह्य वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तोडलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात स्थानिक प्रजातींची झाडे लावून त्यांचे पाच वर्षे संगोपन करावे, पर्यावरणतज्ज्ञांची स्वतंत्र समिती स्थापन करावी आणि स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांच्या हरकती व सूचना विचारात घ्याव्यात, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. जंगलांचे संरक्षण झाले तरच पाणी, हवा, वन्यजीव आणि मानवी जीवन सुरक्षित राहू शकते. त्यामुळे वृक्षतोडीविरोधातील हा लढा जनहिताचा असून भविष्यातील पिढ्यांच्या नैसर्गिक हक्कांच्या संरक्षणासाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार SDPI च्या वतीने व्यक्त करण्यात आला.

या मानव साखळी आंदोलनात जिल्हाध्यक्ष समीर शाह, जिल्हा महासचिव मोहसीन खान, जिल्हा महासचिव अब्दुल अलीम शेख, जिल्हा सदस्य आरेफ शाह, उमर मिर्झा, फुलंब्री विधानसभा कार्याध्यक्ष रफीक शेख, रियाज सौदागर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'विकास हवा, विनाश नको; झाडे वाचवा, जंगल वाचवा, निसर्ग वाचवा' असा संदेश देत आंदोलनाची सांगता करण्यात आली.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित