फरार आरोपींविरोधात ग्रामीण पोलिसांचा धडाका! २२ विशेष पथके मैदानात; ८५ जणांना अटक, ५ आरोपींचा मृत्यू झाल्याचे उघड

जिल्ह्याबाहेरच नव्हे, थेट गुजरातपर्यंत पोलिसांची शोधमोहीम; आतापर्यंत ९० पाहिजे आरोपींचा लागला शोध, उर्वरित आरोपींसाठी मोहीम सुरूच!

फरार आरोपींविरोधात ग्रामीण पोलिसांचा धडाका! २२ विशेष पथके मैदानात; ८५ जणांना अटक, ५ आरोपींचा मृत्यू झाल्याचे उघड
फरार आरोपींविरोधात ग्रामीण पोलिसांचा धडाका! २२ विशेष पथके मैदानात; ८५ जणांना अटक, ५ आरोपींचा मृत्यू झाल्याचे उघड

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १४ :- विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या फरार आणि पाहिजे आरोपींचा शोध घेऊन त्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत तब्बल ८५ आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य ५ आरोपींचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारे एकूण ९० पाहिजे आरोपींचा शोध घेण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेची व्याप्ती गुजरात राज्यापर्यंत पोहोचली आहे.

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबर २०२६ पासून ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या या मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) सूर्यकांत कोकणे काम पाहत आहेत. तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्याकडे मोहिमेच्या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलीस दलाने तब्बल २२ विशेष पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस अंमलदारांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी १० पथके जिल्ह्याबाहेर, तर १२ पथके छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत कार्यरत आहेत.

जिल्ह्याबाहेरील पथकांना जालना, बीड, धाराशिव, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे. आरोपी जिल्ह्याबाहेर किंवा इतर राज्यांत लपून बसले असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी शोधमोहीम व्यापक केली आहे.

गुजरातमधूनही ८ आरोपी जेरबंद!

या विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील विविध ठिकाणांहून ७७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय गुजरात राज्यातून आणखी ८ आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अशा प्रकारे एकूण ८५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शोधकार्यादरम्यान अन्य ५ पाहिजे आरोपी मयत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एकूण ९० आरोपींचा शोध पूर्ण झाला आहे.

गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि स्थानिक पोलिसांशी समन्वय

आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांकडून संभाव्य वास्तव्याच्या ठिकाणांची माहिती संकलित केली जात आहे. गोपनीय माहितीची पडताळणी, उपलब्ध धागेदोऱ्यांचा मागोवा आणि संबंधित जिल्ह्यांतील स्थानिक पोलीस यंत्रणांशी समन्वय साधून कारवाई केली जात आहे. आरोपी राज्यातील विविध भागांत वास्तव्यास असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी शोधकार्याला गती दिली आहे.

मोहीम थांबणार नाही; शेवटच्या फरार आरोपीपर्यंत पोलिसांचा पाठपुरावा!

ही विशेष मोहीम अद्याप सुरू असून, ग्रामीण पोलीस दलाची २२ पथके फरार आणि पाहिजे आरोपींच्या मागावर आहेत. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी माहिती संकलन, पडताळणी आणि विविध पोलीस यंत्रणांशी समन्वयाची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व फरार आरोपींचा शोध लागेपर्यंत ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र वाणी | 

सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित