नारेगावमध्ये ड्रग्सवर पोलिसांचा मोठा घाव; ५३ किलो गांजा व कारसह ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त!

नारेगावमध्ये ड्रग्सवर पोलिसांचा मोठा घाव; ५३ किलो गांजा व कारसह ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त!

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ११ :- MIDC सिडको पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने धडाकेबाज कारवाई करत नारेगाव परिसरातून तब्बल ५३ किलो ४४१ ग्रॅम गांजा जप्त केला असून, यासोबत ५ लाख रुपये किंमतीची फियाट कार असा एकूण ३१ लाख ७२ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छत्रपती नगर, काकडे कॉम्प्लेक्सजवळ सापळा रचला. यावेळी आरोपी विदेश सुरेश माचरे (वय ३८) याच्या ताब्यातील कारमधून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी इतर काही संशयित आरोपींचाही समावेश असून, त्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त प्रशांत स्वामी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विशेष पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तत्परतेने कारवाई करत आरोपींना जेरबंद केले.

सदर प्रकरणी एनडीपीएस अॅक्ट १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गांजा नेमका कुठून आणला व कुठे विक्रीसाठी नेला जात होता, याचा सखोल तपास सुरू आहे.

👉 ड्रग्सविरोधातील ही कारवाई शहरात मोठा संदेश देणारी ठरली असून, पोलिसांचा असा धडाका कायम राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!