छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ दिवस जमावबंदी! शस्त्र, मोर्चे, आंदोलनांवर पोलिसांचा कडक आदेश; नियम तोडल्यास थेट कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ दिवस जमावबंदी! शस्त्र, मोर्चे, आंदोलनांवर पोलिसांचा कडक आदेश; नियम तोडल्यास थेट कारवाई

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि. १५ :- आगामी सण-उत्सव आणि विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात १६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१) व (३) अन्वये हा आदेश जारी केला आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, ज्येष्ठ गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तसेच गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. यासोबतच विविध राजकीय पक्ष, संघटना तसेच कामगार संघटनांकडून मोर्चे, धरणे आणि निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेण्यात आली आहे.

पाच किंवा त्यापेक्षा अधिक जणांच्या जमावाला मनाई

या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास, तसेच पूर्वपरवानगीशिवाय मोर्चा, धरणे, निदर्शने किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

शस्त्रास्त्रांसह स्फोटक पदार्थांवर बंदी

शस्त्रे, तलवार, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा वस्तू बाळगण्यास, तयार करण्यास किंवा वापरण्यास बंदी आहे. तसेच दाहक व स्फोटक पदार्थ सोबत बाळगण्यासही मनाई करण्यात आली आहे.

विशेषतः सण-उत्सव, मिरवणूक किंवा आंदोलनादरम्यान लोखंडी/स्टीलच्या पाइप अथवा दुचाकीच्या सायलन्सरचा वापर करून गावठी पद्धतीने सुतळी बॉम्ब फोडण्याची बंदूक तयार करून वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

प्रक्षोभक भाषणे आणि घोषणांवरही निर्बंध

सार्वजनिक शांतता भंग होईल अशा घोषणा, गाणी किंवा ध्वनिक्षेपकाचा गैरवापर करण्यास मनाई आहे. तसेच सभ्यता, नैतिकता किंवा राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अशी आवेशपूर्ण भाषणे, हावभाव, चित्रे, चिन्हे किंवा फलकांचे प्रदर्शन करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.

या कार्यक्रमांना आदेशातून सूट

अंत्यविधी, विवाह समारंभ, शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी-कर्मचारी आणि पोलिसांनी पूर्वपरवानगी दिलेले कार्यक्रम या आदेशातून वगळण्यात आले आहेत.

हा प्रतिबंधात्मक आदेश १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.०१ वाजेपासून ३० सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लागू राहणार आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १३५ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

— महाराष्ट्र वाणी

सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित