"खत वाटपाच्या ऑनलाईन प्रणालीवर आमदार बोरनारेंचा हल्लाबोल; 'शेतकऱ्यांना त्रास देणारे ॲप तात्काळ बंद करा' अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी"
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ८ :- खरीप हंगामाच्या तोंडावर खत खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या Framework for Fertilizer Sale App या ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र चालकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत वैजापूर मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्यप्रतोद प्रा. रमेश बोरनारे यांनी ही ऑनलाईन पद्धत तात्काळ बंद करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात बोरनारे यांनी नमूद केले की, सध्या सुरू असलेल्या खत वितरण ॲपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी असून त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मल्टी क्रॉप नोंदणी करता न येणे, क्यूआर कोड जनरेट झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृषी सेवा केंद्रावर जाऊन बोटांचे ठसे देण्याची सक्ती, इंग्रजी भाषेतील ॲपमुळे निरक्षर व ग्रामीण शेतकऱ्यांची होणारी गैरसोय, तसेच २४ तासांनंतरच खत खरेदीची परवानगी यांसारख्या अनेक अडचणी त्यांनी निदर्शनास आणून दिल्या.
याशिवाय, जीएफआर (General Fertilizer Recommendation) नुसारच खतांची शिफारस होत असल्याने युरियाला अधिक प्राधान्य मिळत असून इतर संयुक्त खतांचे पर्याय मर्यादित असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. काही कृषी सेवा केंद्रांमध्ये युरियाचा साठा उपलब्ध नसतानाही त्यांच्या नावावर बुकिंग होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
महिला आणि वृद्ध शेतकऱ्यांना केवळ प्रमाणीकरणासाठी वारंवार कृषी सेवा केंद्रांवर चकरा माराव्या लागत असल्याने त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात असल्याचेही बोरनारे यांनी म्हटले आहे. तसेच अनेक शेतकरी सर्व खतांची ऑनलाईन नोंदणी करत असले तरी प्रत्यक्षात केवळ युरियाची मागणी करत असल्याने वितरण व्यवस्थेतही गोंधळ निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सर्व बाबींचा विचार करून शेतकरी हितासाठी जिल्ह्यातील खत वाटपाची ऑनलाईन पद्धत तात्काळ बंद करून पूर्वीची सुलभ व्यवस्था लागू करावी, अशी मागणी आमदार बोरनारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
वाचत राहा महाराष्ट्र वाणी — आपल्या हक्काच्या बातम्यांसाठी!