ईदगाह टी-पॉईंटवर खुलताबाद पोलिसांचा धडाकेबाज अ‍ॅक्शन प्लॅन; बेशिस्त वाहनचालकांना दणका!

पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मोठी नाकाबंदी; इ-चलानद्वारे कारवाईचा बडगा

ईदगाह टी-पॉईंटवर खुलताबाद पोलिसांचा धडाकेबाज अ‍ॅक्शन प्लॅन; बेशिस्त वाहनचालकांना दणका!

महाराष्ट्र वाणी

खुलताबाद, दि. ८ : वाहनधारकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत खुलताबाद पोलिसांनी वेरूळ मार्गावरील ईदगाह टी-पॉईंट येथे अचानक नाकाबंदी करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाई केली. या विशेष मोहिमेमुळे बेशिस्त वाहनधारकांचे धाबे दणाणले असून सुजाण नागरिकांकडून पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत फॅन्सी नंबर प्लेट लावलेली वाहने, विना परवाना वाहन चालविणारे चालक तसेच सीट बेल्टचा वापर न करणाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर इ-चलानद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली.

भर उन्हात स्वतः रस्त्यावर उतरून प्रत्येक वाहनाची बारकाईने तपासणी करणारे पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन यांच्या कार्यपद्धतीची परिसरात चर्चा रंगली आहे. या कारवाईत नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बोडखे तसेच ग्रामीण वाहतूक शाखेचे शेख अनवर यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी राहुल दांडगे, शेख कलीम, फिरोज पठाण, शेख जाकीर, उत्तम खटके आणि अंबादास पावणे यांच्यासह पोलीस पथकाने ईदगाह टी-पॉईंटवर बॅरिकेड्स उभारून कडक बंदोबस्त ठेवला होता.

अचानक झालेल्या या नाकाबंदीमुळे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली असून, वाहतूक शिस्तीसाठी पोलिसांनी उचललेल्या या पावलाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

👉 वाहतूक नियमांचे पालन करा, सुरक्षित प्रवास करा; कारण पोलिसांची नजर आता प्रत्येक नियमभंग करणाऱ्यावर आहे!