PM आवास लाभार्थ्यांसाठी शेवटची संधी; १८ जूनपर्यंत १० टक्के रक्कम भरा, अन्यथा घराचा हक्क रद्द!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ९ :- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महानगरपालिकेमार्फत विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या सदनिकांच्या वाटप प्रक्रियेत निवड झालेल्या लाभार्थ्यांना सदनिकेच्या एकूण किंमतीपैकी १० टक्के रक्कम भरण्यासाठी अंतिम संधी देण्यात आली आहे. या संदर्भात महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी ८ जून रोजी आढावा बैठक घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
महानगरपालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना (AHP) अंतर्गत सुंदरवाडी, पडेगाव, हर्सूल आणि तिसगाव येथील गृहप्रकल्पांमधील एकूण ११ हजार १२० सदनिकांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. स्वतःचे पक्के घर नसलेले तसेच वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पात्र नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
या प्रकल्पांसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड ३० मार्च २०२६ रोजी सोडत पद्धतीने करण्यात आली. निवड झालेल्या लाभार्थ्यांना सदनिकेच्या एकूण किंमतीपैकी १० टक्के रक्कम जमा करण्याबाबत टपालाद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. यासाठी ६ जून २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती.
मात्र, अनेक लाभार्थ्यांनी अद्याप आवश्यक रक्कम जमा न केल्यामुळे महानगरपालिकेने ही मुदत वाढवून १८ जून २०२६ पर्यंत अंतिम संधी दिली आहे. या कालावधीत संबंधित लाभार्थ्यांनी अनिवार्यपणे रक्कम भरावी, अन्यथा त्यांना वाटप करण्यात आलेल्या सदनिकेवरील हक्क रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
तसेच, मुदतीनंतर रद्द झालेल्या सदनिकांचे वाटप प्रतीक्षा यादीतील अथवा इतर पात्र अर्जदारांना करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी अंतिम मुदतीची नोंद घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
तुमच्या स्वप्नातील घराची संधी गमावू नका; १८ जूनपूर्वी आवश्यक रक्कम भरून सदनिकेवरील हक्क निश्चित करा! 🏠📢