विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा शिक्षक की घोटाळ्याचा सूत्रधार? RCC चालक शिवराज मोटेगावकर

विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा शिक्षक की घोटाळ्याचा सूत्रधार? RCC चालक शिवराज मोटेगावकर

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १९ :- एकेकाळी विद्यार्थ्यांच्या यशामागचं मोठं नाव मानल्या जाणाऱ्या शिवराज मोटेगावकर यांच्यावर आता गंभीर आरोपांची सावली पडली आहे. लातूरमधील प्रसिद्ध RCC कोचिंग संस्थेचे संस्थापक आणि रसायनशास्त्र विषयातील तज्ज्ञ म्हणून ओळख असलेल्या मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केल्याने शिक्षणविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

एम.एस्सी. केमिस्ट्रीमध्ये सुवर्णपदक मिळवणारे मोटेगावकर यांनी NET, SET आणि GATE सारख्या स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या या नावाभोवती आता संशयाचं वर्तुळ निर्माण झालं आहे.

पुण्यात सुरू असलेल्या चौकशीदरम्यान त्यांचं नाव समोर आल्यानंतर सीबीआयच्या 28 सदस्यीय पथकाने सलग अनेक तास तपास आणि चौकशी केली. त्यानंतर करण्यात आलेल्या अटकेमुळे राज्यभरात चर्चांना उधाण आलं आहे.

या प्रकरणामुळे केवळ एका व्यक्तीवर प्रश्न उपस्थित झालेले नाहीत, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

“शिक्षण हे विश्वासावर उभं असतं… आणि तोच विश्वास डळमळीत झाला, तर त्याची किंमत संपूर्ण समाजाला मोजावी लागते.”