रुग्णालयांतील अग्निसुरक्षेचा भोंगळ कारभार उघड; शहरातील १० मोठ्या हॉस्पिटलना मनपाची नोटीस

रुग्णालयांतील अग्निसुरक्षेचा भोंगळ कारभार उघड; शहरातील १० मोठ्या हॉस्पिटलना मनपाची नोटीस

छत्रपती संभाजीनगर दि १३ :- शहरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या सुविधांची महापालिकेकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. या पाहणीत अनेक रुग्णालयांमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिकेने शहरातील २०० ते ३०० किंवा त्यापेक्षा अधिक खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयांची तपासणी हाती घेतली आहे. एशियन हॉस्पिटलमधील एनआयसीयूला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर ही मोहीम अधिक गांभीर्याने राबवली जात आहे.

तपासणीदरम्यान काही रुग्णालयांच्या आयसीयूमध्ये आपत्कालीन बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र दरवाजाची सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी अग्निशमन यंत्रणा उपलब्ध असली तरी ती प्रत्यक्ष वापराच्या स्थितीत नसल्याचे आढळले. याशिवाय रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेल्या रॅम्पची कमतरता आणि आपत्कालीन परिस्थितीत कोणती पावले उचलायची याबाबत कर्मचाऱ्यांना पुरेशी माहिती नसल्याचेही तपासणीत समोर आले.

या त्रुटींची गंभीर दखल घेत महापालिकेने एमजीएम, एम्स, धूत, अपेक्स, सिग्मा, मेडिकव्हर, बजाज, एशियन, हेडगेवार आणि बेंबडे या १० रुग्णालयांना नोटीस बजावली आहे.

रुग्णालयांमध्ये आग किंवा अन्य आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास रुग्ण, विशेषतः अतिदक्षता विभागातील रुग्ण, तातडीने सुरक्षित स्थळी हलविणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, रॅम्प तसेच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण याबाबत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे.

आता नोटीस मिळालेल्या रुग्णालयांकडून त्रुटींची पूर्तता कशी केली जाते आणि त्यानंतर महापालिका कोणती कारवाई करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित