महापालिका कार्यालयात हस्तक्षेप, दबाव आणि 'नगरसेवक' म्हणून वावर करणाऱ्यांवर लगाम; अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ७ :- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कामकाजात नगरसेवकांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी आयुक्त अमोल येडगे यांनी कडक कार्यालयीन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार केवळ निवडून आलेल्या अधिकृत नगरसेवक आणि नगरसेविकांनाच महापालिकेच्या कामकाजात सहभागी होण्याचा आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत मत मांडण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेच्या निदर्शनास आले आहे की, काही नगरसेवकांचे पती, पत्नी, वडील, भाऊ, मुले आदी नातेवाईक मुख्यालय, प्रभाग कार्यालये तसेच विकासकामांच्या ठिकाणी वावरून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करत आहेत. काही जण स्वतःला नगरसेवक असल्याचा आभास निर्माण करून सोशल मीडियावर तसा उल्लेख करणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांना नगरसेवक म्हणून फोन करणे, कार्यालयांना नगरसेवकांच्या अधिकारात भेट देणे तसेच खासगी कार्यालयांमध्येही नगरसेवक म्हणून ओळख वापरण्याचे प्रकार समोर आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, निवडून आलेल्या नगरसेवक व नगरसेविकांना योग्य तो सन्मान द्यावा; मात्र त्यांच्या नातेवाईकांच्या कोणत्याही सूचना किंवा आदेशांचे पालन करू नये. तसेच कोणत्याही दबावाला बळी पडून कायद्याविरोधी किंवा नियमबाह्य कामे करू नयेत.
तथापि, संबंधित नातेवाईक नागरिक म्हणून कार्यालयात आल्यास त्यांची कायदेशीर व नियमानुसार कामे करण्यात यावीत, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेने सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांना आपल्या नातेवाईकांना या परिपत्रकाची माहिती देण्याचे आवाहन केले असून कार्यालयीन शिस्त अबाधित राहावी आणि महापालिकेच्या प्रतिमेला धक्का पोहोचू नये, यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.