अंभईचा अभिमान! लेकींची पोलिस दलात दमदार एंट्री; ग्रामस्थांकडून भव्य जल्लोष
महाराष्ट्र वाणी
अंभई (वा.) : अंभई गावासाठी अभिमानाचा क्षण ठरावा अशी घटना घडली असून गावातील तीन विद्यार्थिनींनी पोलिस दलात निवड मिळवत यशाची नवी उंची गाठली आहे. वैष्णवी मिसाळ, स्नेहल सुरडकर आणि लक्ष्मी बावस्कर या जिद्दी लेकींच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या तिन्ही विद्यार्थिनींच्या यशाचे सेलिब्रेशन करत ग्रामस्थांच्या वतीने गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात काढलेल्या या मिरवणुकीत गावकऱ्यांनी जागोजागी त्यांचे स्वागत करून सत्कार केला.
याच कार्यक्रमात उमेश दांडगे, बालाजी डमाळे आणि पवन सपकाळ यांचीही पोलिस दलात निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला. तसेच पवन इंगळे याची टीए आर्मी (प्रादेशिक सेना) मध्ये निवड झाल्याने त्याचाही विशेष सत्कार करण्यात आला.
रविवारी सकाळी गावातील कदीम मस्जिद प्रांगणात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पहार, शाल आणि श्रीफळ देऊन भव्य सत्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी गावातील मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य रजनी नगरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य दामूअण्णा गव्हाणे, डॉ. असलम बेग, पोलिस पाटील दगडू मैंद, रब्बानी शाह यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
अंभई गावातील या यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवत इतर तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
“अंभईच्या लेकींची ही भरारी… आता प्रत्येक घरातून उडणार यशाची पाखरं!”