मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते MRTI कार्यालय शुभारंभाची मागणी; अर्थसंकल्पात ₹१००० कोटींच्या तरतुदीचे निवेदन

मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते MRTI कार्यालय शुभारंभाची मागणी; अर्थसंकल्पात ₹१००० कोटींच्या तरतुदीचे निवेदन
मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते MRTI कार्यालय शुभारंभाची मागणी; अर्थसंकल्पात ₹१००० कोटींच्या तरतुदीचे निवेदन

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ५ :- राज्यातील अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शिख, पारशी, जैन व ज्यू समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वांगीण प्रगतीसाठी स्थापन करण्यात आलेली अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (MRTI – मार्टी) तातडीने कार्यान्वित करण्यात यावी, अशी ठाम मागणी मार्टी कृती समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने २२ ऑगस्ट २०२४ रोजी शासन निर्णयाद्वारे MRTI स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असला, तरी अद्याप संस्थेचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झालेले नाही. आगामी शैक्षणिक वर्ष २०२६–२७ सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर हजारो अल्पसंख्याक विद्यार्थी Ph.D. फेलोशिप, परदेशी शिष्यवृत्ती, UPSC/MPSC प्रशिक्षण तसेच एकसमान सर्वंकष धोरण यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांपासून वंचित राहत असल्याची गंभीर बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महसूल परिषदेच्या बैठकीतील निर्देश तसेच विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर अभ्यास समितीच्या अहवालानुसार अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

तसेच मा. पंतप्रधानांच्या नवीन १५ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी MRTI ही संस्था अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचेही सांगण्यात आले.

निवेदनातील प्रमुख मागण्या :

येणाऱ्या राज्य अर्थसंकल्पात (२०२६–२७) MRTI साठी स्वतंत्र शिर्षाखाली किमान ₹१००० कोटींची तरतूद करावी.

मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन करून जागा निश्चिती व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

संस्थेसाठी DPR तात्काळ मंजूर करावी.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती व कोकण विभागात उपकेंद्रे स्थापन करावीत.

बार्टी, सारथी, महाज्योती व अमृत संस्थांच्या धर्तीवर MRTI साठीही एकसमान सर्वंकष धोरण लागू करावे.

मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते MRTI कार्यालयाचा शुभारंभ झाल्यास हा क्षण अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक व प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.

या मागणीचे निवेदन समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अझहर पठाण, उपाध्यक्ष सईद आसिफ, सरचिटणीस अ‍ॅड. वासिम कुरेशी, सचिव शाबाझ पठाण व सहसचिव नबील उझ जमा यांनी स्वाक्षरी करून सादर केले आहे.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी MRTI लवकर कार्यान्वित होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.