महापौर समीर राजुरकर यांच्याकडून ३०१ पुस्तकांचे दान; मनपा शाळांमध्ये वाचनालय उभारणीच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महापौर समीर राजुरकर यांच्याकडून ३०१ पुस्तकांचे दान; मनपा शाळांमध्ये वाचनालय उभारणीच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
महापौर समीर राजुरकर यांच्याकडून ३०१ पुस्तकांचे दान; मनपा शाळांमध्ये वाचनालय उभारणीच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि. १९ :- १९महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना विविध विषयांवरील पुस्तके सहज उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या पुस्तक दान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महापौर समीर राजुरकर यांनी या उपक्रमात ३०१ मराठी पुस्तके दान करून सहभाग नोंदविला. आज दिवसभरात एकूण ६९९ पुस्तके दान स्वरूपात जमा झाली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून मनपाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनालये सुरू करण्याचे नियोजन आहे. या वाचनालयांमध्ये पुस्तक दानातून जमा होणारी पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

महापालिका मुख्यालयात आयोजित उपक्रमादरम्यान महापौर समीर राजुरकर यांनी ३०१ मराठी पुस्तके दान केली. शिक्षण विभागाकडून जमा झालेल्या पुस्तकांचे मराठी, इंग्रजी आणि उर्दू अशा भाषांनुसार वर्गीकरण करण्यात येत आहे.

नागरिकांनी आपल्या घरातील विविध विषयांवरील जुनी, सुस्थितीतील पुस्तके दान करून या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. या पुस्तकांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी आणि वाचनाची सवय विकसित करण्यासाठी होईल, असे आवाहन महापौर समीर राजुरकर यांनी केले. उपमहापौरांनीही नागरिकांना पुस्तक दान करण्याचे आवाहन केले.

अधिकारी, पदाधिकारी आणि शिक्षकांचाही सहभाग

या उपक्रमात अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील आणि उपआयुक्त अंकुश पांढरे यांनी प्रत्येकी ५० मराठी पुस्तके दान केली. मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा, जुबली पार्क येथील सहशिक्षिका फिरदौसी शबाना तब्बसुम मसूद अहमद यांनी मराठीची १७८ आणि इंग्रजीची १२८ पुस्तके दान केली.

यावेळी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, जालिंदर शेंडगे, रणजीत पाटील, उपआयुक्त अंकुश पांढरे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, सांस्कृतिक अधिकारी सर्वेश नांद्रेकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे रवींद्र खरात, अजित बुळे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी समृद्ध वाचनालये उभारण्याच्या या उपक्रमात नागरिक, शिक्षक आणि पुस्तकप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित