“कर्करोगाविरुद्ध संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण मोहिम”

“कर्करोगाविरुद्ध संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण मोहिम”

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २३ :- महानगरपालिकेचे आयुक्त मा. जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली बन्सीलालनगर रुग्णालय येथे “कर्करोगाविरुद्ध संरक्षण कवच – एचपीव्ही लसीकरण मोहीम” दि. 23 मार्च 2026 रोजी सुरू करण्यात आली.

या उपक्रमाच्या उद्घाटनावेळी प्रभाग क्र. 18 च्या नगरसेविका हर्षदाताई संजय शिरसाट, नगरसेवक अभिजित देविदास जीवनवाल, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला भामरे, डॉ. पंडित सिरसाट, डॉ. सुर्यकुमार ठाकूर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान एचपीव्ही (HPV) लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी एचपीव्ही हा प्रमुख कारणीभूत विषाणू असून, योग्य वयात लसीकरण केल्यास या गंभीर आजारापासून प्रभावी संरक्षण मिळू शकते, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. ही लस पूर्णपणे सुरक्षित व प्रभावी असून भविष्यातील आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असल्याचेही सांगण्यात आले.

या मोहिमेअंतर्गत 14 ते 15 वयोगटातील 10 मुलींना लसीकरण करून त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. पुढील काळात सिडको एन-8, सिडको एन-11, कैसर कॉलनी, सिल्कमिल कॉलनी व बन्सीलालनगर रुग्णालय येथेही ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

महानगरपालिकेने पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या 14 ते 15 वयोगटातील मुलींना वेळेत एचपीव्ही लस देऊन त्यांचे आरोग्य सुरक्षित करावे.

“आजची लस — उद्याचा सुरक्षित भविष्यकाळ!”