‘एक क्लिकवर बजेट’ची मागणी; शहर विकासासाठी ॲड अझर पठाण यांची आयुक्तांसोबत सखोल चर्चा!

‘एक क्लिकवर बजेट’ची मागणी; शहर विकासासाठी ॲड अझर पठाण यांची आयुक्तांसोबत सखोल चर्चा!
‘एक क्लिकवर बजेट’ची मागणी; शहर विकासासाठी ॲड अझर पठाण यांची आयुक्तांसोबत सखोल चर्चा!

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १० :- महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांना सहज, सोपा आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध व्हावा, यासाठी “एक क्लिकवर उपलब्ध” डिजिटल बजेट बुक तयार करण्याची महत्त्वपूर्ण मागणी ‘वेलकम शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्था’चे सचिव अॅड. अझर पठाण यांनी महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे केली.

सादर करण्यात आलेल्या निवेदनात महानगरपालिकेच्या सर्व विभागांतील अर्थसंकल्पीय तरतुदी, खर्चाचा तपशील आणि विकासकामांची माहिती डिजिटल माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवली, तर प्रशासनातील पारदर्शकता अधिक मजबूत होईल, असे नमूद करण्यात आले.

यावेळी आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शहराच्या सर्वांगीण विकासावर सविस्तर चर्चा झाली असून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि प्रशासनातील पारदर्शकता या विषयांवर विशेष भर देण्यात आला.

दरम्यान, शहरातील बंद पडलेल्या १४ महानगरपालिका शाळांचे आधुनिकीकरण करून तेथे CBSE किंवा ICSE अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. प्रत्येक वर्गात डिजिटल लायब्ररी, इंटरनेट सुविधा आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NNMS) योजनेत १०० टक्के पात्र विद्यार्थ्यांचा समावेश व्हावा, यासाठी शाळास्तरावर विशेष मार्गदर्शन, सराव परीक्षा आणि तयारी उपक्रम राबवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

तसेच शहरातील फेरीवाला (पथविक्रेता) प्रश्न अधिकच गंभीर होत असल्याने, त्यावर ठोस धोरण आखून तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. यामुळे फेरीवाल्यांना न्याय मिळेल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि शहराच्या विकासाला गती मिळेल, असे मत व्यक्त करण्यात आले.

आयुक्त अमोल येडगे यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेत शहराच्या विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

या प्रसंगी अॅड. अझर पठाण, सामाजिक कार्यकर्ते तलाह सिद्दीकी व इतर मान्यवर उपस्थित होते.

👉 “डिजिटल पारदर्शकतेकडे शहराची वाटचाल; नागरिकांच्या एका क्लिकवर संपूर्ण हिशेब!”