पोलिसांचा मोठा अंमली पदार्थांवर प्रहार! 343 किलो गांजा-चरस आणि 499 कोडेन सिरपच्या बाटल्यांचा कायदेशीर नाश
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २९ :- पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगरकडून अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला आणखी एक महत्त्वाचे पाऊल मिळाले आहे. विविध पोलीस ठाण्यांमध्ये NDPS Act अंतर्गत जप्त करण्यात आलेला 343 किलो 573 ग्रॅम गांजा व चरस तसेच कोडेन औषधी सिरपच्या 499 बाटल्या, असा एकूण 49 लाख 2 हजार 883 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला.
पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या आदेशानुसार नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या अंमली पदार्थांचा नाश करण्याची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातील केंद्रीय गोडावूनमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेला विविध पोलीस ठाण्यांमधील NDPS Act अंतर्गत जप्त मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
गांजा आणि चरस मिळून 343 किलो 573 ग्रॅम, तर कोडेन औषधी सिरपच्या 499 बाटल्या असा हा मुद्देमाल होता. NDPS कायद्यातील तरतुदींनुसार आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा मुद्देमाल शासनमान्य Maharashtra Enviro Power Ltd., MIDC रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे येथे कडक बंदोबस्तात शासकीय वाहनातून नेण्यात आला. त्यानंतर नियमानुसार त्याचा कायदेशीर नाश करण्यात आला.
या कारवाईत एमआयडीसी वाळूज, उस्मानपुरा, सिटीचौक, वेदांतनगर, हर्सूल, दौलताबाद, सिडको, एमआयडीसी सिडको, बेगमपुरा, वाळूज, सातारा आणि क्रांतीचौक या पोलीस ठाण्यांमध्ये NDPS Act अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा समावेश होता.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-1) पंकज अतुलकर, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक राजेश यादव, एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत राहीरे यांच्यासह अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या मुद्देमाल मोहरील व कर्मचाऱ्यांच्या पथकाने पार पाडली.
अंमली पदार्थांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी जप्त केलेल्या मुद्देमालाचा कायदेशीर पद्धतीने नाश करण्याची ही कारवाई पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेतील महत्त्वाची प्रक्रिया ठरली आहे.
महाराष्ट्र वाणी
सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित