सिल्लोडमध्ये गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी उघड! ४८० बाटल्या जप्त; कारसह २.८५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित मद्याची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; डोंगरगाव फाट्यावर वाहन पकडले

सिल्लोडमध्ये गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी उघड! ४८० बाटल्या जप्त; कारसह २.८५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सिल्लोडमध्ये गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी उघड! ४८० बाटल्या जप्त; कारसह २.८५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १० :- गोवा राज्यात विक्रीसाठी उपलब्ध असलेले आणि महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य बेकायदेशीररीत्या वाहून नेण्याचा प्रकार सिल्लोड परिसरात उघडकीस आला आहे. दिनांक 9 ऑक्टोबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ई विभाग, सिल्लोड पथकाने डोंगरगाव फाटा परिसरात कारवाई करत गोवा बनावटीच्या रॉयल गोवा व्हिस्कीच्या ४८० सीलबंद बाटल्या आणि मद्य वाहतुकीसाठी वापरलेली चारचाकी कार असा एकूण २ लाख ८५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सुनील रामभाऊ वाघ (रा. माणिकनगर-भवन, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

डोंगरगाव फाट्यावर कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, जळगाव ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील डोंगरगाव फाटा, डोंगरगाव शिवार, तालुका सिल्लोड येथे ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या मद्याची वाहतूक होत असल्याचे आढळल्यानंतर विभागाच्या पथकाने संबंधित वाहनावर कारवाई केली.

कारसह ४८० मद्याच्या बाटल्या जप्त

या कारवाईत पांढऱ्या रंगाची टाटा इंडिगो ईसीएस कार (क्रमांक MH-16-AT-1542) जप्त करण्यात आली. या वाहनाची अंदाजे किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे. तसेच, केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेल्या रॉयल गोवा व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या ४८० सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मद्याची अंदाजे किंमत १ लाख ५ हजार ६०० रुपये आहे. वाहन आणि मद्य मिळून एकूण २ लाख ८५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अभिनव बालुरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एन. आर. मुंजाळ, दुय्यम निरीक्षक ए. टी. बिडकर, व्ही. जी. साळुंके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अनंत शेंदरकर तसेच जवान कृष्णा पाटील, राहुल बनकर, अमित नवगिरे आणि प्रेम सुरे यांच्या पथकाने केली.

या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक एन. आर. मुंजाळ करीत आहेत.

अवैध मद्याबाबत माहिती देण्याचे आवाहन

अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीसंदर्भात कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित