महामार्गावर चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी; स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला पाठलाग करून पकडले!

गंगापूरच्या गुन्ह्याचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून छडा; चोरीतील मोटारसायकलसह मोबाईल जप्त

महामार्गावर चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी; स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला पाठलाग करून पकडले!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) वि १२ :- अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चाकूचा धाक दाखवून शेतकऱ्याची रोकड आणि मोटारसायकल जबरीने चोरून नेल्याच्या प्रकरणाचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीचा पाठलाग करून त्याला पेंढापूर फाट्याजवळ मोटारसायकलसह पकडण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि मोबाईल जप्त केला आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील शिंगी येथील एकनाथ जगन्नाथ वाघ (वय ५२) हे शेती व्यवसाय करतात. त्यांना २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १.३० ते २ वाजेदरम्यान अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर मार्गावरील पेंढारकर फार्महाऊसच्या पाटीजवळ अडवण्यात आले. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड आणि होंडा शाईन मोटारसायकल जबरदस्तीने चोरून नेण्यात आल्याची तक्रार आहे.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास

गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने गंगापूर ते अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल्सचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला.

११ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल अंचर काळे (रा. अंतापूर, ता. गंगापूर) हा या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आला. तो मोटारसायकलवरून गंगापूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.

पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न; पाठलाग करून पकडले

संशयित मोटारसायकलवरून जाताना दिसताच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने महामार्गावरील वाहतुकीचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून पेंढापूर फाट्याजवळ त्याला मोटारसायकलसह पकडले.

पोलिसांच्या चौकशीत त्याने २७ ऑगस्ट रोजी घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेबाबत कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून मोटारसायकल आणि मोबाईल जप्त करून त्याला पुढील तपासासाठी गंगापूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, कासीम शेख, दत्ता मुंडे, गोपाल पाटील, संतोष डोंगरे, बलविरसिंग बहुरे, सनि खरात, योगेश तरमळे, जीवन घोलप आणि शिवाजी मगर यांचा सहभाग होता.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित