मराठवाडा पदवीधर निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांना कस्ट्राईब महासंघाचा पाठिंबा; राजकीय समीकरणांना नवी दिशा!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २१ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना महाराष्ट्र राज्य कस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने पाठिंबा जाहीर केला आहे. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी काल दिनांक 19 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे डॉ. पाटील यांची भेट घेऊन आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत अधिकृत पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. या पाठिंब्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रचाराला कर्मचारी संघटनेचे बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निवडणूक आता कोणत्याही एका गटाची किंवा व्यक्तीची मक्तेदारी राहिलेली नाही, तर परिवर्तनाची नवी संधी निर्माण झाली आहे, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत महासंघाने निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पदवीधर, कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्नांना या निवडणुकीत महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत कर्मचारी कल्याण महासंघाने डॉ. पाटील यांना दिलेला पाठिंबा त्यांच्या प्रचाराच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीत विजयाचा विश्वासही व्यक्त केला.
पाठिंबा जाहीर करताना हे पदाधिकारी उपस्थित
यावेळी महासंघाचे अतिरिक्त सचिव डॉ. अनिल पांडे, महासचिव प्रा. देवानंद वानखडे, प्राचार्य ज्ञानेश्वर मानेराव, डॉ. बाळासाहेब लिहिणार, डॉ. अरुण शिरसाट, डॉ. अशोक बंडगर, अनिल वानखडे, एन. जे. पठाण, सुबोध सावळे, डॉ. राम भोसले, प्रा. मोढेकर, डॉ. राहुल तायडे, प्रा. गुणरत्न सोनोने आदी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुशील बोर्डे यांचीही उपस्थिती होती.
कस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या पाठिंब्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराला नवा आयाम मिळाला असून, आगामी काळात विविध संघटना आणि पदवीधर मतदारांची भूमिका काय राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित