सिल्लोड तालुका दूध संघावर शिवसेनेचा झेंडा; चेअरमनपदी देविदास लोखंडे, व्हाईस चेअरमन सय्यद सत्तार बिनविरोध

महाराष्ट्र वाणी.Com
सिल्लोड (प्रतिनिधी) दि ३ जून :– सिल्लोड तालुका शेतकरी सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत 14 पैकी सर्व संचालक बिनविरोध निवडून आणले. दिनांक २ जून रोजी ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.
या निवडणुकीनंतर चेअरमनपदी देविदास पांडुरंग लोखंडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी सय्यद सत्तार बागवान यांची एकमताने निवड झाली. दोघांचीही निवड बिनविरोध झाली असून संघाच्या नव्या कार्यकारिणीवर शिवसेनेचा ठसा उमटलेला दिसत आहे.
विशेष म्हणजे, अंभई येथील ग्रामपंचायत सदस्य समाधान भुईगळ यांना आमदार अब्दुल सत्तार यांनी सदस्य म्हणून संधी देत संघाच्या व्यवस्थापनात सहभागी करून घेतले आहे. ही संधी मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील तरुण नेतृत्वाला व्यासपीठ मिळाले आहे.
निवडीनंतर आमदार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड येथील जनसंपर्क कार्यालयात — सेना भवन येथे — नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांचा सत्कार करण्यात आला. आमदार सत्तार यांनी या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन केले.