सिडकोतील बजरंग चौकात रक्तरंजित थरार! बंटी दीक्षित यांची हत्या; जुन्या वादाचा संशय

सिडकोतील बजरंग चौकात रक्तरंजित थरार! बंटी दीक्षित यांची हत्या; जुन्या वादाचा संशय

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २२ :- शहरातील सिडको परिसरातील बजरंग चौकाजवळ गुरुवारी भरदिवसा एका तरुणाची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. देवेश उर्फ बंटी दीक्षित असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणात पवन पराशर हा संशयित आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बंटी दीक्षित यांना प्रथम कारने धडक देण्यात आली. त्यानंतर लाकडी दांड्याने त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बंटी दीक्षित यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर संशयित आरोपी पोलीस ठाण्यात हजर

या घटनेनंतर संशयित आरोपी पवन पराशर स्वतः वाहन घेऊन सिडको पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळावरून तपासासाठी आवश्यक माहिती गोळा केली.

हत्येमागील कारणाचा शोध सुरू

हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून घडला, जुन्या वादाचे स्वरूप काय होते आणि घटनेच्या वेळी नेमके काय घडले, याचा तपास पोलीस करत आहेत. तपासातून पुढे येणाऱ्या बाबींनंतर घटनेचे अधिक तपशील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

शहरातील गजबजलेल्या बजरंग चौक परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

महाराष्ट्र वाणी | छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)