"स्व. वसंतदादांचा वारसा भाजपकडे!" जयश्रीताई पाटील यांच्यासह भाजपमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश,
महाराष्ट्र वाणी न्युज
सांगली दि१८ जून :- सांगली जिल्ह्यात आज एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या सुसंस्कृत राजकीय वारशाचे खंबीर नेतृत्व करणाऱ्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सांगली महानगरपालिकेतील माजी महापौर, माजी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य तसेच असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हा पक्षप्रवेश केवळ वैयक्तिक नव्हता, तर संपूर्ण सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारा ठरला. जयश्रीताईंच्या नेतृत्वातील या मोठ्या गटाच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाची सांगलीतील संघटनात्मक ताकद आणि सामाजिक व्याप्ती लक्षणीय वाढली आहे.
प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे भाजपमध्ये मनःपूर्वक स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे तसेच इतर अनेक मान्यवर, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे भाजपच्या 'सशक्त महाराष्ट्र' मोहिमेस नवे बळ मिळाले असून सांगली जिल्ह्यात आगामी राजकारणावर याचा मोठा परिणाम होणार, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.